मनाचे श्लोक
जेथे शंकर रामनाम सांगतो
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी। तयेमाजि जातां गती पूर्वजांसी। मुखें रामनामावळी नित्यकाळीं। जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी॥
जगात वाराणसी धन्य आहे; ती पुण्याची रास आहे. तेथे गेले, तर पूर्वजांनाही सद्गती मिळते. चंद्रमौळी शंकराच्या मुखी रामाची नामावळी नित्य असते; आणि प्रत्येक जिवाचे हित कशात आहे, हे तो सदा सांगत असतो. काशीत देह ठेवायला पुष्कळ लोक जात असत. परंपरा सांगते, की तेथे मरणाऱ्या प्रत्येकाच्या कानात शंकर रामनाम सांगतो, आणि त्याला मुक्त करतो. दासबोधातही समर्थ म्हणतात, की रामनामामुळेच वाराणसी मुक्तिक्षेत्र झाली.