मनाचे श्लोक
खूप दिवसांनी आपली भेट
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना । मनीं मानसीं द्वैत कांहीं बसेना । बहूतां दिसां आपुली भेटि जाली । विदेहीपणें सर्व काया निवाली ॥
त्या ओळखीत दुसरे काही कधीच दिसत नाही. मनात, अंतःकरणात द्वैताच्या भावनेला जराही थारा मिळत नाही. खूप खूप दिवसांनी आपलीच आपल्याशी भेट झाली. विदेही अवस्थेत सारी काया निवली, शांत झाली. इतक्या दिवसांनी भेटलेला कोणी परका नाही; तो आपलाच आत्मा आहे. ताप उतरल्यावर तापलेले अंग जसे निवते, तसा हा गारवा.