मनाचे श्लोक
फुटत नाही, तुटत नाही
फुटेना तुटेना चळेना ढळेना। सदा संचलें मीपणें तें कळेना। तया एकरूपासि दूजें न साहे। मना संत आनंत शोधूनि पाहे॥
हे मना, संतांना शोधून काढ, आणि त्यांच्या संगतीत अनंताचा शोध घे. ते फुटत नाही, तुटत नाही; ते चळत नाही, ढळत नाही. ते सदा सगळीकडे भरून राहिले आहे; पण ‘मी’ आणि ‘माझे’ म्हणणाऱ्या मीपणाला ते कळत नाही. ते एकरूप आहे; आपल्याशेजारी दुसरे काही असणे त्याला सहन होत नाही. फुटणे, तुटणे, चळणे, ढळणे: डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या वाट्याला हे आज ना उद्या येतेच.