मनाचे श्लोक
रघुनायकाचा वीट नको
नको वीट मानूं रघूनायेकाचा। अती आदरें बोलिजे राम वाचा। न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा। करी घोष त्या जानकीवल्लभाचा॥
रघुकुळाचा नायक जो राम, त्याचा कधी वीट मानू नकोस. वाणीने रामनाम घे, आणि ते घेताना मनात आदर ठेव. नाम घ्यायला तुझे काहीच खर्च होत नाही; ते तोंडातच आहे, फुकट. म्हणून त्या जानकीवल्लभाचा मोठ्याने घोष कर. येथे वीट म्हणजे एखादी गोष्ट अति झाल्यावर येणारा कंटाळा; गोड फार खाल्ले, की ते नकोसे होते, तसा. रोज म्हटलेला शब्दही कधी कधी शिळा वाटू लागतो. त्या शिळेपणावर श्लोक नाम कमी करायला सांगत नाही, अधिक घ्यायला सांगतो: मोठ्याने घोष कर.