मनाचे श्लोक
सर्वांना प्रिय, सदा सत्यवादी
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
तो सर्वांशी सरळपणे वागतो, आणि सगळ्या लोकांना प्रिय असतो. तो सदा, प्रत्येक क्षणी खरे बोलतो, आणि विवेकाने बोलतो. साधा शब्द असो की त्रिवाचा देऊन केलेले वचन, तो खोटा शब्द कधीच उच्चारत नाही. तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य. एखादा शब्द तीनदा उच्चारणे, म्हणजे त्रिवाचा; पूर्वी हे सर्वांत गंभीर आश्वासन मानले जाई. या भक्ताचा साधा शब्द आणि त्याने दिलेले वचन सारखेच खरे असतात.