आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधींची । विसरों नये ॥ ३८॥
अहमात्मा, म्हणजे मी आत्मा आहे, हे कधीही विसरू नये. निश्चयाची, न डळमळणारी आत्मबुद्धी हीच मोक्षश्रीची, मुक्तीच्या वैभवाची दशा आहे.
ज्याला ज्ञान झाले, त्याला ही सूचना का? कारण, सिद्धाच्या लक्षणांच्या या समासात समर्थ सांगतात, आत्मज्ञान झाले असले, तरी देहाचा अभिमान संदेह वाढवतो. पुन्हा देहबुद्धी आठवली, की विवेकाची शुद्धीच उडते. म्हणून मी आत्मा आहे, ही जाणीव भक्कम करावी.