दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल ।
रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥
आधी शाश्वत काय, ते ओळखावे, असे समर्थ याच्या आधी सांगतात. स्थिर, चंचल आणि जड, हे सारे मायेचाच पसारा आहे. माया म्हणजे जे दिसते, भासते आणि बदलते ते सारे. खोटे टाकून खरे घ्यावे, आणि मायेचे सारे रूप भासमय आहे हे जाणावे.
समर्थ म्हणतात, जे जे दिसेल ते ते नाश पावेल. जे जे जन्मेल ते ते मरेल. जे जे रचले जाईल ते ते ढासळेल. हेच मायेचे रूप.
पुढच्या ओवीत ते म्हणतात, जे वाढेल ते मोडेल, जे येईल ते जाईल.