निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
दृष्टीस लागली सवे · दासबोध ६.२.२०-२१
दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पहावें । परंतु गुज तें जाणावें । गौप्य आहे ॥ २०॥ प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार । सद्गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥ २१॥
याच्या आधी समर्थ परब्रह्माचे वर्णन करतात. शस्त्राने ते तुटत नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने विरघळत नाही. ते दिसत नाही, तरी सर्वत्र सूक्ष्म रूपाने भरून राहिले आहे. समर्थ म्हणतात, डोळ्यांना सवय लागली आहे, जे दिसेल तेच पाहायचे. पण जे खरे गुज आहे, ते गुप्त आहे, हे जाणावे. जे प्रकट आहे ते असार, आणि जे गुप्त आहे ते सार, हे जाणावे. हा विचार सद्गुरूच्या मुखातून ऐकल्यावर उमजू लागतो. सद्गुरू म्हणजे आत्मज्ञान देणारा खरा गुरू.