निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
परमेश्वरास वोळखिलें आपण कोणसें कळलें · दासबोध १०.८.२२-२४
परमेश्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें । आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥ ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें । मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥ येथेंअनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला । प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥
कच्चा वैद्य निवडला, तर पोराचा प्राण जातो. प्रचीतीविना, स्वतःच्या अनुभवाविना, ज्ञानाचेही तसेच; त्याने समाधान मिळत नाही, असे समर्थ प्रचीतीच्या या समासात सांगतात. परमेश्वराला ओळखले, आपण कोण हे कळले, आणि आत्मनिवेदन घडले, म्हणजे स्वतःला देवाला पूर्ण अर्पण केले, तरच खरे बरे. हे ब्रह्मांड कोणी केले, कशापासून उभारले, हे जाणून त्याच्या मुख्य कर्त्याला ओळखले, तरच खरे बरे. येथे अनुमानच, म्हणजे नुसता अंदाजच राहिला, तर केलेला परमार्थ वाया गेला. प्रचीतीविना माणूस संशयात बुडून जातो.