निवडक दासबोध ओव्या · Devotion
बहुत करावें पाठांतर · दासबोध ४.२.३-५
बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर । भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥ अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा । हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥ नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥
नवविधा भक्तीतली पहिली, श्रवणभक्ती सांगून झाल्यावर समर्थ या समासात दुसरी भक्ती सांगतात: कीर्तन. कीर्तन म्हणजे लोकांसमोर देवाचे गुण आणि कथा गाऊन, सांगून, त्याचा महिमा वाढवणे. समर्थ सांगतात, पुष्कळ पाठांतर करावे. नाना ग्रंथ कंठात धरावेत, म्हणजे तोंडपाठ करावेत. आणि भगवंताची कथा निरंतर करत जावी. आपल्या सुखासाठी, आपल्या हितासाठी हरिकथा पुन्हा पुन्हा करावी. हरिकथेशिवाय मुळीच राहू नये. नित्य नवी हौस धरावी, अतिशय उद्योग करावा, आणि हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे. पुढे समर्थ सांगतात, भगवंताला कीर्तन प्रिय आहे, आणि कलियुगात पुष्कळ लोकांना हरिकीर्तन हाच उपाय आहे.