निवडक दासबोध ओव्या · Devotion
देवावेगळें कोणीं नाहीं · दासबोध ४.८.१९-२०
देवावेगळें कोणीं नाहीं । ऐसें बोलती सर्वहि । परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥ म्हणौनी ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें । अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥ २०॥
सख्यभक्ती म्हणजे देवाला आपला सखा मानून केलेली भक्ती; नवविधा भक्तीतली ही आठवी. मेघ वेळेवर बरसला नाही तरी चातक आपली निष्ठा बदलत नाही; तशी देवाशी मैत्री असावी, असे समर्थ या समासात सांगतात. भगवंतालाच सखा, माता, पिता, सगेसोयरे मानावे. समर्थ म्हणतात, देवावेगळे कोणी नाही, असे सगळेच बोलतात. पण त्यांची निष्ठा तशी नसते. म्हणून असे करू नये. सख्य करायचे, तर खरेच करावे. परमेश्वराला अंतरात दृढ धरून ठेवावे. पुढच्या ओवीत ते सांगतात, आपल्या मनासारखे घडले नाही म्हणून देवावर रागावणे, ही सख्यभक्तीची लक्षणे नव्हेत.