निवडक दासबोध ओव्या · Devotion
दिधल्याविण पाविजेना पेरिल्याविण उगवेना · दासबोध ७.१०.२०-२२
दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना । ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥ न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती । असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥
देहापलीकडच्या स्थितीच्या या समासात समर्थ लोकांच्या एका समजुतीवर बोट ठेवतात. शुक्लपक्षात, उत्तरायणात, दिवसा मरण आले, शेवटच्या क्षणी देवाचे स्मरण झाले, तर सद्गती मिळते; शेवटी भगवंत भेटतोच, असे लोक मानतात. जिवंतपणी पेरलेच नाही, तर उगवणार कुठून, असे समर्थ विचारतात. दिल्याशिवाय मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही, हे वाक्य लोकांना ठाऊकच आहे. सेवेचे काम काही न करता एखादा धन्याला म्हणतो, माझा मुशाहिरा, म्हणजे पगार कुठे आहे? तसेच, भक्ती न करणाऱ्या माणसाचे शेवटी हित घडत नाही. जिवंतपणी भगवंताची भक्ती नाही, तर मेल्यावर मुक्ती कुठून होणार? असो; जे जे असे करतात, त्यांना तसेच फळ मिळते, असे समर्थ सांगतात.