निवडक दासबोध ओव्या · Devotion
नमस्कारास वेचावें नलगे · दासबोध ४.६.२२-२३
नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे । नमस्कारांस कांहींच नलगे । उपकर्ण सामग्री ॥ २२॥ नमस्कारा ऐसें नाहीं सोपें । नमस्कार करावा अनन्यरूपें । नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३॥
वंदन ही नवविधा भक्तीतली सहावी भक्ती, म्हणजे देवाला आणि संतांना नमस्कार करणे. नमस्काराने कृपा उचंबळते, पापांचे डोंगर नाश पावतात, असे समर्थ या समासात आधी सांगतात. नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही. कष्ट करावे लागत नाहीत. कोणतेही उपकरण किंवा सामग्री लागत नाही. नमस्कारासारखे सोपे दुसरे काही नाही. नमस्कार अनन्यभावाने, मनात दुसरे काही न ठेवता करावा. मग नाना साधनांसाठी धडपड करून शिणायचे कशाला, असे समर्थ विचारतात.