निवडक दासबोध ओव्या · Devotion
निर्गुणीं ज्ञान जालें · दासबोध १०.७.१६-१८
निर्गुणीं ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें । तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥ नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान । म्हणोनियां जपध्यान । सांडूंच नये ॥१७ ॥ सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी । म्हणोनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥
निर्गुण म्हणजे रूप, गुण नसलेले परब्रह्म; सगुण म्हणजे रूप धारण केलेला देव, ज्याची पूजा, भजन करता येते. या समासात समर्थ सांगतात, एक गुरू, एक देव, कुठे तरी भाव असावा; भावाविना सगळे वाया जाते. समर्थ म्हणतात, निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून कोणी सगुणाकडे दुर्लक्ष केले, तर तो ज्ञाता दोन्हीकडून नागवला जातो. त्याला भक्तीही राहत नाही आणि ज्ञानही लाभत नाही; मध्येच अभिमान पसरून बसतो. म्हणून जप आणि ध्यान कधीही सोडू नये. जो सगुण भजन सोडील, तो ज्ञाता असला तरी अपयशीच ठरतो. म्हणून सगुण भजन सोडूच नये, असे समर्थ पुन्हा ठासून सांगतात.