पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास ।
ऐसी हे प्रचित मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥
भक्ताच्या या समासात समर्थ सांगतात, देव आणि भक्त यांचे मूळ शोधत गेले की उपाधिरहित आत्माच उरतो. मीपण बुडते, बंधन तुटते, आणि अशा ज्ञानाने आणि विवेकाने बहुत लोक पावन झाले.
समर्थ म्हणतात, देवाला पतितपावन म्हणतात, म्हणजे पडलेल्यांना, पापात बुडालेल्यांना पवित्र करणारा. त्या पतितपावनाचे जे दास आहेत, तेही जगाला पावन करतात. पुष्कळांच्या मनाला याची प्रचीती आलेली आहे.