निवडक दासबोध ओव्या · Devotion
तो अंतर्देव चुकती · दासबोध १८.८.११-१२
तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती । प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥ मग विचारिती अंतःकर्णीं । जेथें तेथें धोंडा पाणी । उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ॥ १२ ॥
अंतर्देवाच्या या समासात समर्थ सांगतात, देहाला चालवणारा आत्मा, जाणीवरूपाने आत राहणारा, तोच खरा देव. समर्थ म्हणतात, लोक हा अंतरीचा देव चुकवतात आणि धावाधाव करत तीर्थांना जातात. देवाला न ओळखता बिचारे प्राणी कष्ट करतात. मग ते आपल्या अंतःकरणात विचार करतात: जिथे जावे तिथे दगड आणि पाणीच. उगाच वणवण हिंडून काय होते?