निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
गत गोष्टीस ऐकिलें · दासबोध १७.३.९-१०
गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काये हातास आलें । म्हणती पुण्य प्राप्त जालें । परी तें दिसेना कीं ॥ ९ ॥ तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रचितीचा विचार । कळतां अनुमानाचा संव्हार । होत जातो ॥ १० ॥
श्रवणाच्या या समासात समर्थ सांगतात, अध्यात्मग्रंथाचा विचार रत्ने पारखावीत किंवा सोने पुटात घालावे, त्याहूनही कोटिपट सावधपणे करावा. कहाण्या, कथा, पोवाडे आणि अवतारांची मोठमोठी चरित्रे यांत अध्यात्मविद्या सर्वांत वजनदार आहे. समर्थ विचारतात, होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या, त्याने हाती काय आले? लोक म्हणतात पुण्य मिळाले, पण ते पुण्य काही दिसत नाही. अध्यात्माचे सार तसे नाही. हा प्रचीतीचा, प्रत्यक्ष अनुभवाचा विचार आहे. तो जसजसा कळतो, तसतसा केवळ अनुमानाने बांधलेल्या कल्पनांचा नाश होत जातो.