निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
जनास दिसे हा दुश्चित · दासबोध १४.७.१५
जनास दिसे हा दुश्चित । परी तो आहे सावचित । अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं ॥ १५ ॥
युगधर्माच्या या समासात एका ठिकाणी समर्थ खऱ्या भगवद्भक्ताचे वर्णन करतात. तो अंतरातून विरक्त आहे, आत्मज्ञानी आहे, आणि त्याच्या केवळ दर्शनाने लोकांना समाधान मिळते. समर्थ म्हणतात, लोकांना तो दुश्चित, म्हणजे लक्ष नसलेला, कुठेतरी हरवलेला दिसतो. पण तो पूर्ण सावधचित्त असतो. त्याचे चित्त अखंड परमेश्वरात असते. तो कशात मग्न असतो, ते पुढच्या ओवीत समर्थ सांगतात: उपास्य देवाच्या मूर्तीच्या ध्यानात, आत्म्याच्या अनुसंधानात, नाहीतर श्रवण आणि मननात, निरंतर.