निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
जो ब्रह्मज्ञान उपदेसी · दासबोध ५.२.९-१०
जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानांधारें निरसी । जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९॥ विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत । तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्गुरु ॥ १०॥
गुरूच्या लक्षणांच्या या समासात समर्थ नाना प्रकारचे गुरू सांगतात. औषधे, किमया, गायन, वादन, पोटापाण्याचा धंदा शिकवणारे, आई आणि वडील, हे सगळे गुरूच. पण पैलतीराला पोहोचवणारा सद्गुरू त्यांच्याहून वेगळा. तो कोण, ते समर्थ सांगतात. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो, आणि जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य घडवतो, तो सद्गुरू. जीव आणि शिव, म्हणजे माणूस आणि परमेश्वर, वेगळे आहेत या द्वैतामुळे देव आणि भक्त दुरावले आहेत. त्या देवाची आणि भक्ताची पुन्हा एकी करतो, तोच सद्गुरू.