निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
सेत पेरिलें आणी उगवलें · दासबोध ५.३.९-११
सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें । साधनेंविण तैसें जालें । साधकांसी ॥ ९॥ जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे । पीक आलियांहि, उगें- । राहोंचि नये ॥ १०॥ तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तर्ह्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥
शिष्याच्या लक्षणांच्या या समासात समर्थ शेतीचे दृष्टांत देतात. उत्तम जमिनीत किडके बी पेरले, किंवा उत्तम बी खडकावर पडले, तर काही उगवत नाही. तसे सद्गुरू आणि खरा शिष्य, दोघेही हवेत; आणि पावसाविना बी उगवत नाही, तसे अध्यात्मनिरूपणाविना काही होत नाही. समर्थ म्हणतात, शेत पेरले आणि उगवलेही, पण निगा राखली नाही म्हणून ते वाया गेले. साधनेविना साधकांचे असेच होते. पीक आपल्या हाती येऊन भोगता येईपर्यंत सगळे कष्ट करावे लागतात. पीक आले तरी स्वस्थ बसून चालत नाही. तसेच आत्मज्ञान झाले, तरी साधना केलीच पाहिजे. एकदा भरपूर जेवलो, तरी पुढच्या जेवणाची सामग्री लागतेच.