वैद्य मात्रेची स्तुती करी । मात्रा गुण कांहींच न करी ।
प्रचितिविण तैसी परी । ज्ञानाची जाली ॥ १८ ॥
अनुमानाचे निरसन करणाऱ्या या समासात समर्थ अनुभव नसलेल्या तथाकथित ज्ञात्यांवर बोट ठेवतात. असा माणूस भ्रमालाच परब्रह्म म्हणतो, आणि परब्रह्मालाच भ्रम म्हणतो. प्रचीतीविना निरूपण करतो, शास्त्रांचे दडपण घालतो, आणि काही विचारायला गेले तर उगाच वैतागतो.
समर्थ म्हणतात, वैद्य आपल्या मात्रेची, म्हणजे औषधाची, खूप स्तुती करतो, पण त्या मात्रेचा गुण काहीच येत नाही. प्रचीतीविना ज्ञानाची अशीच गत झाली आहे.