निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
अभ्यासें प्रगट व्हावें · दासबोध १९.७.१७
अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें । प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥
अभ्यास करूनच लोकांपुढे प्रगट व्हावे. नाहीतर झाकून राहावे. प्रगट होऊन मग नासणे, हे बरे नव्हे. प्रयत्नाच्या या समासात समर्थ महंतीविषयी, म्हणजे साधकांचा समुदाय चालवण्याविषयी बोलतात. आधीच्या ओव्यांत ते म्हणतात, ज्याला लोकांत वागता येत नाही, त्याच्या कामी महंती येत नाही. त्याने परलोकाच्या साधनेचा उपाय ऐकून स्वस्थ राहावे. ज्याला स्वतःलाच नीट पोहता येत नाही, त्याने लोकांना बुडवण्याचे काय काम? पुढे ते विचारतात, मंद माणूस हळूहळू चालतो, तो चपळ लोकांना कसा आवरणार? अरबी घोडा फिरवणारा कसा असावा? ही धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे आहेत. भोळ्या भावाने, गोंधळलेल्या मनाने ती कशी घडणार?