निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
बहुतांचे मुखी उरावें · दासबोध १४.६.३२-३३
बहुतांचे मुखी उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥ शाहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टिमधें भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥
अनेकांच्या मुखात आपण उरावे, आणि अनेकांच्या अंतरात भरून राहावे. यासाठी प्राणिमात्राशी उत्तम गुणांनी वागावे. लोकांना शहाणे करावे. पतितांना पावन करावे. आणि या सृष्टीत भगवंताचे भजन वाढवावे, असे समर्थ सांगतात. चातुर्याच्या, म्हणजे माणसे आणि व्यवहार जाणण्याच्या शहाणपणाच्या, या समासात समर्थ आधी उलट माणसाचे चित्र रेखाटतात. जो आपल्याला शहाणे करू जाणत नाही, आपले हितही जाणत नाही, लोकांत मैत्री राखू जाणत नाही आणि वैर करतो, त्याला अज्ञानी म्हणावे. त्याच्यापाशी कोणाला समाधान मिळणार? एकटाच सृष्टीत भांडत चालला, तर अनेकांमध्ये त्या एकट्याला यश कसे मिळेल?