निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार · दासबोध १८.६.२०
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार । जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥
धर्माची स्थापना करणारे पुरुष हे ईश्वराचे अवतार आहेत. असे पुरुष होऊन गेले आहेत, आणि पुढेही होणार आहेत. हे ईश्वराचे देणे आहे, असे समर्थ सांगतात. उत्तम पुरुषाच्या या समासात समर्थ अशा पुरुषाचे एकेक गुण सांगतात, आणि प्रत्येकाच्या शेवटी म्हणतात: देणे ईश्वराचे. न्याय, नीती, विवेक आणि दुसऱ्याचे अंतर पारखणे. मोठा प्रयत्न, वेळेवर धैर्य, आणि अद्भुत कार्य. देव, ब्राह्मण आणि आचारविचार सांभाळणे, आणि अनेकांचा आधार होणे. इहलोक आणि परलोक दोन्ही पाहणे. पुष्कळ लोकांचे सोसणे आणि त्यांचे पालन करणे. थोडे पुढे समर्थ सांगतात, सर्व गुणांचे सार म्हणजे योजकता, विवेक आणि विचार. त्यांच्या योगाने इहलोक आणि परलोक, दोन्हींचा पैलतीर गाठता येतो.