निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
दुर्जन प्राणी समजावे · दासबोध १९.९.२३-२४
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥ जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । याकारणें ते वाट । बुझूनि टाकावी ॥ २४ ॥
दुर्जन कोण, हे मनात ओळखावे, पण ते उघड करू नये. उलट सज्जनांपेक्षाही अधिक महत्त्व देऊन त्यांना आळवावे, गोड बोलून जवळ घ्यावे. लोकांमध्ये दुर्जन उघडे पडले, तर मग सतत खटखट चालते. म्हणून ती वाटच बुजवून टाकावी. राजकारणाच्या, म्हणजे माणसे आणि व्यवहार कुशलतेने हाताळण्याच्या कलेच्या, या समासात समर्थ आधी म्हणतात, मुख्य सूत्र आपल्या हाती घ्यावे, आणि काम लोकांकरवी करवून घ्यावे. खळ दुर्जनांना भ्यायले आणि राजकारण राखले नाही, तर बरे-वाईट सगळेच उघड होते. समुदाय मोठा हवा, तर त्याचे तणावे, म्हणजे बांधून ठेवणारे दोर, बळकट असावेत. मठ करून ताठा धरू नये.