निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
जितुकें कांहीं आपणासी ठावें · दासबोध १९.१०.१४
जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें । शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥
जितके काही आपल्याला ठाऊक आहे, तितके हळूहळू शिकवावे. अशा रीतीने पुष्कळ लोकांना शहाणे करून सोडावे. विवेकाच्या लक्षणांच्या या समासात समर्थ आधी सांगतात की नाना देशांचे नाना लोक येतात आणि जातात. त्या सगळ्यांची मने धरावीत, आणि ती विवेकाने, विचाराने भरावीत. किती लोक आहेत, किती समुदाय आहेत, याचा अंदाजही लागत नाही. तरी असा विवेकी सगळ्या लोकांना श्रवणात आणि मननात घालतो. पुढच्या ओव्यांत ते म्हणतात, नाना प्रकारांनी शिकवावे, आणि वाटेतल्या अडचणी सांगत जाव्यात. लोकांना असे स्वच्छ करून सोडणे, हे निस्पृहाचे काम. जे आपल्याला होईल, ते आपण करावे. जे होणार नाही, ते लोकांकरवी करवून घ्यावे. पण भगवंताचे भजन राहून जावे, हा धर्म नव्हे.