निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
लोक बहुत शोधावे · दासबोध ११.१०.२१-२३
लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे । जाणजाणोन धरावे । जवळी दुरी ॥ २१ ॥ अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नस्तां वेर्थ जातें । जाणोनि शोधावीं चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥ अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें । आपला मगज राखणें । कांहीतरी ॥ २३ ॥
पुष्कळ लोकांची पारख करावी, आणि त्यांचे अधिकार जाणावेत. अधिकार म्हणजे एखाद्या कामाची पात्रता. ते जाणून कोणाला जवळ धरावे आणि कोणाला दूर, ते ठरवावे. अधिकाराप्रमाणे काम होते. अधिकार नसेल, तर ते व्यर्थ जाते. हे जाणून नाना प्रकारांनी लोकांची मने शोधावीत. अधिकार पाहूनच काम सांगावे. साक्षेप, म्हणजे कामातली तत्परता पाहूनच विश्वास ठेवावा. आणि आपला मगज, म्हणजे आपला गाभा, काहीतरी राखून ठेवावा, असे समर्थ सांगतात. निस्पृहाच्या, स्वतःसाठी काहीच न इच्छिणाऱ्या साधकाच्या, वर्तणुकीच्या या समासात याच्या आधी ते सांगतात: आधी कष्ट, मग फळ; कष्टच नाही, ते निष्फळ.