मुलाचे चालीनें चालावें । मुलाच्या मनोगतें बोलावें ।
तैसें जनास सिकवावें । हळुहळु ॥ २४ ॥
मुलाबरोबर चालताना मुलाच्या चालीने चालावे. त्याच्याशी बोलताना त्याच्या मनाप्रमाणे बोलावे. तसेच लोकांनाही हळूहळू शिकवावे.
शिकवणीच्या या समासात समर्थ आधी सांगतात की निंद्य ते सोडून द्यावे, आणि वंदनीय ते हृदयात धरावे. सर्व लोकांना राजी राखावे, आणि त्यांना हळूहळू पुण्यवान करत जावे. पुढच्याच ओवीत ते म्हणतात, दुसऱ्याचे मनोगत राखणे हेच चातुर्याचे मुख्य लक्षण.