निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
प्रत्यये बोलोन उठोन गेला · दासबोध १५.२.१९-२१
प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला । नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥ परी तो कोठें आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना । वेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २० ॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकार्यासारिखा स्वरूपें । तेथें येशकीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥
निस्पृहाच्या कार्याच्या या समासात समर्थ अशा कार्यकर्त्याचे चित्र रंगवतात. निस्पृह म्हणजे स्वतःसाठी काहीच न इच्छिणारा साधक. तो नेमकी, काळजाला भिडणारी वचने बोलतो, आणि प्रत्ययाच्या, म्हणजे अनुभवाच्या बळावर नाना मतांचा निकाल लावतो. तो अनुभवाचे बोलून उठून निघून जातो, आणि लोकांना त्याची चटक लागते. नाना मार्ग सोडून ते त्याला शरण येतात. पण तो कुठे आढळत नाही, कोणत्याही ठिकाणी सापडत नाही. वेष पाहिला, तर तो एखाद्या हीनदीनासारखा दिसतो. रूपाने भिकाऱ्यासारखा दिसणारा तो गुप्त रूपाने उदंड काम करतो. तेथे त्याच्या यशाने, कीर्तीने आणि प्रतापाने सगळ्या सीमा ओलांडल्या. पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात, ठिकठिकाणी तो भजन लावतो, आणि आपण तेथून निसटतो.