निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
ऐसें शरीर बहुतांचें · दासबोध १.१०.६०-६१
ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥
गोचीड शरीराचे रक्त पितात, पिसवा चावून पळतात, जळवा रक्त शोषतात, विंचू आणि साप दंश करतात. वाघ-लांडगे ते उचलून नेतात. नरदेहाच्या स्तवनाच्या समासात समर्थ अशा जीवांची मोठी यादी देतात. असे हे शरीर अनेकांचे आहे, आणि मूर्ख त्याला ‘आमचे’ म्हणतो. पण हे तर जीवांचे खाद्य आहे. हे दासबोधात अन्यत्र त्रिविध तापांच्या, म्हणजे जीवाला होणाऱ्या तीन प्रकारच्या दुःखांच्या निरूपणात सांगितले आहे. हा देह परमार्थाला लावला, तरच त्याचे सार्थक झाले. नाहीतर नाना आघात सोसत, मृत्यूच्या वाटेने तो व्यर्थच गेला, असे समर्थ सांगतात.