अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि समर्थावरी मन चाले ।
ज्ञाते वैभवें दपटले । या नांव भ्रम ॥ २७ ॥
भ्रमाच्या निरूपणाचा हा समास. समर्थ भ्रमाची एकामागून एक उदाहरणे देतात, आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी म्हणतात: याचे नाव भ्रम.
तोंडाने म्हणायचे, सारे मिथ्या आहे, खोटे आहे. आणि मन मात्र समर्थांकडे धावते. येथे समर्थ म्हणजे धनवान आणि सत्ताधारी लोक. जाणते लोकही वैभव पाहून दबून जातात. याचे नाव भ्रम, असे रामदासस्वामी म्हणतात.