निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं · दासबोध १०.६.३४
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं आणि वाचून जाते सटी । ऐशा प्रकारीच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
भ्रमाच्या निरूपणाच्या या समासात समर्थ लोकांच्या भ्रामक समजुतींची यादी देतात. प्रचीतीशिवाय औषध घेणे आणि स्वतःच्या अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे, हेही भ्रमच, असे ते याच्या आधी सांगतात. ब्रह्मदेव माणसाचे अदृष्ट, म्हणजे दैव, लिहितो, आणि सटवाई ते वाचून जाते. अशा प्रकारच्या गोष्टी, याचे नाव भ्रम, असे समर्थ म्हणतात. बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी सटवाई येऊन त्याचे भविष्य वाचते, अशी त्या काळी लोकसमजूत होती. पुढच्या ओव्यांत समर्थ सांगतात, असे भ्रम उदंड आहेत; थोडे सांगितले ते कळावे म्हणून. निर्गुण ब्रह्म, म्हणजे गुणांच्या पलीकडचे परम सत्य, ते सोडून बाकी सारे भ्रमरूप आहे.