निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
नरदेह परम दुल्लभ · दासबोध २०.५.२५-२७
नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ । दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥ बरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥ येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥
हा लोक आणि परलोक, विवेक आणि अविवेक, हे सारे फक्त मनुष्यच जाणू शकतो. हे सांगून समर्थ नरदेहाकडे वळतात. नरदेह परम दुर्लभ आहे. याच्या योगाने एरवी न मिळणारा लाभ घडतो; जे दुर्लभ, ते याच्यात सुलभ होते. इतर देह म्हणजे नुसते काबाडकष्ट; नरदेह मात्र मोठे घबाड आहे. पण त्यासाठी विवेकाची भक्कम रचना पाहिजे. विवेक म्हणजे शाश्वत काय आणि नश्वर काय, याचा भेद ओळखणे. येथे ज्याने आळस केला, तो सर्वस्वी बुडाला. विवेकाच्या बळावर त्याने देव ओळखलाच नाही, असे समर्थ म्हणतात.