सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।
मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ॥ ८ ॥
काही माणसे स्वभावतःच नेमके बोलतात, नेमके वागतात, आणि सर्व लोक त्यांच्यावर प्रसन्न असतात. काही गुण अभ्यासाने येत नाहीत, काहींना ते स्वभावतःच येतात, असे समर्थ सांगतात. अशा दुर्मीळ माणसाच्या वर्णनाच्या ओघात ते हा दोष सांगतात.
सगळ्या अवगुणांमधला अवगुण हा, की आपलेच अवगुण आपल्याला गुण वाटतात. हे मोठे पाप आहे, मोठे करंटेपण, म्हणजे अभागीपण; ते चुकवता येत नाही.