निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
संसार हाचि दीर्घ स्वप्न · दासबोध ७.१.२०
संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन । माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २०॥
सद्गुरू, संत आणि श्रोते यांना वंदन करून समर्थ या समासात श्रोत्यांना सावध होऊन ऐकायला सांगतात. आणि विषयाला सुरुवात करताना पहिले वाक्य हे सांगतात. हा संसार म्हणजेच एक दीर्घ स्वप्न आहे. लोभामुळे लोक त्यात झोपेत बरळल्यासारखे बडबडत असतात: माझी बायको, माझे धन, माझी मुलगी, माझे मुलगे. पुढच्या ओव्यांत समर्थ हेच चित्र पुढे नेतात. ज्ञानाचा सूर्य मावळला, आणि सारे विश्व अंधाराने भरले. देहबुद्धी आणि अहंकारात लोक घोरत झोपले आहेत. झोपेतच ते मरतात, आणि पुन्हा जन्मताच झोपी जातात.