जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।
कोठें तर्ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥
जगात सर्वांचा मित्र, जगमित्र व्हायचे, तर त्याचे सूत्र जिभेपाशी आहे, म्हणजे आपल्या बोलण्यात आहे. आणि कुठे ना कुठे सत्पात्र, म्हणजे योग्यतेचा भला माणूस, शोधून काढावा.
लोकांमध्ये कसे वागावे, हे हा समास सांगतो. आधी ठिकठिकाणची माहिती घेऊन मगच गावात प्रवेश करावा; प्रत्येकाशी आपलेपणाने बोलावे; कोणाला उच्च किंवा नीच म्हणू नये; सर्वांची हृदये निववावीत, असे समर्थ आधी सांगतात. असे लोक कुठे भेटतात, ते पुढची ओवी सांगते: जेथे कथा होते तेथे जावे आणि दूर, नम्रपणे बसावे. तेथे भले लोक आढळतात.