निवडक दासबोध ओव्या · Worldly Life Done Well
झिजल्यावांचून कीर्ति कैंची · दासबोध १९.३.२४
झिजल्यावांचून कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे होते ची ची । अवलक्षणें ॥ २४ ॥
झिजल्यावाचून कीर्ती कुठून मिळणार? मान्यता काही फुकटची नसते. अवलक्षणांनी मात्र जिकडे तिकडे छीथू होते, असे समर्थ सांगतात. हा समास करंट्याची, म्हणजे दुर्भागी माणसाची लक्षणे सांगतो. आधीच्या ओव्यांत समर्थ म्हणतात, त्याला काहीच पुरते कळत नाही, तरी सभेत बोलल्याशिवाय त्याला राहवत नाही. मग हा बडबड्या, लबाड आहे, हे लोकांना कळून येते. उलट ज्याचा नेमकेपणा पुष्कळ लोकांना कळून आला, तोच माणूस पृथ्वीवर मान्य झाला. पुढच्या ओवीत ते सांगतात, जो भल्यांची संगत धरत नाही, आणि स्वतःला शहाणे करत नाही, तो आपला आपणच वैरी, हे जाणा.