शब्दरत्नें परीक्षावीं । प्रत्ययाचीं पाहोन घ्यावीं ।
येर ते अवघीं सांडावीं । येकीकडे ॥ ३ ॥
शब्दांची रत्ने रत्नपारख्यासारखी पारखून घ्यावीत. जी प्रत्ययाची, अनुभवाला उतरणारी आहेत, ती पाहून घ्यावीत. बाकीची सगळी एका बाजूला सोडून द्यावीत.
या समासात समर्थ विचाराविना केलेल्या पाठांतराची खिल्ली उडवतात. धान्य पुष्कळ मोजले, पण त्या मापाने ते खाल्ले नाही; तसेच हे. पाठ म्हणताना आवरत नाही, आणि विचारले तर काहीच कळलेले नसते; अनुभव पाहायला गेले, तर सारे अनुमानात पडते.
पुढच्या ओवीत ते सांगतात, नुसती नावे आणि रूपे सोडून अनुभवावर मांडणी करावी. सार आणि असार एकच करणे, हा मूर्खपणा.