विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
विचार केल्याशिवाय बोलू नये. मागचा-पुढचा विचार केल्याशिवाय पाऊल टाकू नये. आणि मर्यादा सोडून साधी हालचालही करू नये.
उत्तम लक्षणांच्या समासाच्या आरंभीचे हे नियम आहेत. ज्या गुणांनी शहाणपणाची खूण अंगी बाणते, ते सांगण्याआधी समर्थ श्रोत्यांना सावध होऊन ऐकायला सांगतात. वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, अशी साध्या गोष्टींनी ते सुरुवात करतात.