तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १०१: आतां तरी पुढें हा चि उपदेश
आतां तरी पुढें हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावें देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥ तुका ह्मणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥
आता तरी, यापुढे माझा एवढाच उपदेश आहे: आपल्या आयुष्याचा नाश करू नका. मी सगळ्यांच्या पाया पडून दंडवत घालतो; आपापले चित्त शुद्ध करा. हित कशात आहे? मन एकाग्र करून देवाचे चिंतन करावे, त्यात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यात लाभ होतो, तोच व्यापार करा. याहून फार काय शिकवायचे?