तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ११४: तिर्थी धोंडा पाणी
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥ मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥ तीर्थी भाव फळे । येथें आनाड तें बळे ॥२॥ तुका ह्मणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
तीर्थक्षेत्री असतात ते दगड आणि पाणी; पण सज्जनांच्या ठायी देव प्रत्यक्ष, रोकडा भेटतो. संतांची संगत मिळाली, की आपले अंग त्यांना समर्पित करणे, यातच खरे भले आहे. तीर्थावर ज्याचा जसा भाव, तसे त्याला फळ मिळते; इथे मात्र अनाडी माणसालाही ते बळेच मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, पाप निघून जाते; आणि ते गेले, की आपण कसला ताप सोसत होतो, ते कळते.