तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १२०५: नाहीं संतपण मिळतें हें हाटीं
नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥१॥ नये मोल देतां धनाचिया राजी । नाहीं ते आकाशीं पाताळीं तें ॥२॥ तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥३॥
संतपण बाजारात विकत मिळत नाही. गुहांमधून, रानावनांतून भटकले, तरी ते मिळत नाही. धनाच्या राशी ओतल्या, तरी त्याचे मोल होत नाही. ते आकाशात नाही, आणि पाताळातही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ते मिळते फक्त जिवाच्या बदल्यात. नाहीतर त्याच्या गोष्टीही बोलू नयेत.