तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १३३६: बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥२॥ तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥३॥
विठ्ठलच बोलावा, विठ्ठलच पाहावा, आणि आपला जीव-भाव सगळा विठ्ठलच करावा. या ध्यासाने माझे मन हावरे झाले आहे; ते आता मागे फिरत नाही. बंधनाची गाठ सुटली, आणि मला निवांतपणे त्याला मिठी मारता आली. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाने माझा देह भरून टाकला आहे. काम आणि क्रोध घर रिकामे करून निघून गेले.