तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १३५४: पोटापुरतें काम
पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥१॥ कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥ प्रारब्धीं हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥ तुका ह्मणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
पोटापुरते काम जरूर करावे; पण खरी गरज आहे ती रामाची. म्हणून खरे काम एकच करा: चित्तात पांडुरंगाला धरून ठेवा. हव्यास कशाचाही असो, ते मिळणे प्रारब्धाच्या हाती आहे; आपण जोडायची ती देवाची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात, आपले सगळे बळ आणि सगळी बुद्धी त्यासाठी खर्ची घालावी.