तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १४३२: दया क्षमा शांति
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥ तुका ह्मणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥
जिथे दया, क्षमा आणि शांती असते, तिथे देवाची वस्ती असते. तो धावत त्या घरी पोहोचतो, आणि तिथेच आश्रय धरून राहतो. कीर्तनाच्या वाटेवर तर तो भुकेल्या भिकाऱ्यासारखा लोटत येतो. तुकाराम महाराज म्हणतात, नामाने पूजा घडते, आणि नामानेच देव जोडला जातो.