तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १५१७: अवघा तो शकुन
अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥१॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥ संग हरिच्या नामाचा । शुचिर्भूत सदा वाचा ॥२॥ तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिसां ॥३॥
हृदयात देवाचे चरण असणे, हाच सगळा शुभशकुन. इथे देवाचा वियोग नसेल, तर मग लाभाला काय उणे? हरीच्या नामाची संगत असली, की वाणी सदा शुचिर्भूत, पवित्र राहते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासांना प्रत्येक दिवस शुभकाळच असतो.