तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १५८५: मागणें तें एक तुजप्रति आहे
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥ तुका ह्मणे आतां उदार होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥
पांडुरंगा, माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे; देणार असशील, तर बघ. मला या संतांच्या स्वाधीन कर, एवढेच दे. याशिवाय मी तुझ्याकडे दुसरे काहीच मागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता उदार हो, आणि मला संतांच्या पायांशी ठेव.