तुकारामांचे निवडक अभंग
अभंग १८७१: जाऊं देवाचिया गांवां
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार । देव सुखाचा सागर ॥२॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥ तुका ह्मणे आह्मी बाळें । या देवाचीं लडिवाळें ॥४॥
चला, देवाच्या गावाला जाऊ. देव आपल्याला विसावा देईल. देवाला आपले सुख-दुःख सांगू. देव आपली भूक शमवील. आपला सगळा भार देवावरच घालू. देव सुखाचा सागर आहे. आता त्याच्या पायांना जडून देवापाशीच जवळ राहू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवाची लाडकी बाळे आहोत.