तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २: सुंदर तें ध्यान उभें विटेवरी
सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥३॥
कमरेवर हात ठेवून विटेवर उभे असलेले ते रूप किती सुंदर आहे! गळ्यात तुळशीचा हार, कमरेला पिवळा पीतांबर. हेच रूप मला सतत आवडते. त्याच्या कानांत मकराच्या आकाराची कुंडले तळपतात, आणि कंठात कौस्तुभ मणी झळाळतो. तुकाराम महाराज म्हणतात, हेच माझे सगळे सुख आहे. त्याचे श्रीमुख मी प्रेमाने डोळे भरून पाहत राहीन.