तुकारामांचे निवडक अभंग
अभंग २१२८: वाचे विठ्ठल नाहीं
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥१॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥३॥ हरिभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥ तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥
ज्याच्या वाणीत विठ्ठल नाही, तो प्रेतच आहे, हे पाहा. धिक्कार असो त्याच्या जगण्याचा! त्याचा भार पृथ्वीलाही सहन होत नाही. तो कीर्तनात कधी बसत नाही, आणि देवाचे गुण कानांनी ऐकत नाही. देवळात जायचे म्हटले की त्याला कंटाळा येतो; तो काळ्या तोंडाचा कुत्राच. हरिभक्तीशिवायचे त्याचे शहाणपण जळो! तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाने आपल्या वंशाला उणेपणा आणला.